भोकर / सिध्दार्थ जाधव / : भोकर शहरासह तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून चालू असलेली प्रतिबंधित गुटखा, मटका, रसायन मिश्रित शिंदी,अवैद्य दारू विक्री आदींसह सर्व प्रकारचे अवैद्य धंदे बंद न केल्यास तालुक्यात विविध सामाजिक संघटना व पक्षाच्या वतीने तालुक्यातील अवैद्य धंद्या विरुद्ध रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करणार असल्याचे निवेदन दिनांक ९ ऑक्टोंबर रोजी उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या एका निवेदनात म्हंटले आहे.
शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा भोकर शहरात गुटखा साठ्याचे छुपे गोदाम, होलसेल दुकान तर आहेतच यासह गोळीभांडरच्या नावाखाली खुलेआम गुटखा विक्री चालू असून प्रत्येक पान टपरी,हॉटेल, किराणा दुकानांवर गुटखा विक्री करण्यासाठी बिनधास्तपणे लडी सजवून ठेवलेल्या पाहावयास मिळत आहेत.तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुण शहरातील बेकरीमध्ये अल्पोपहारासाठी मिळणाऱ्या वस्तू खरेदीसाठी जात नसून तो दूर्दैव असे पोलिसांच्या आशीर्वादाने मटका खेळायला जात असल्याचे दिसून येत आहे.
शहरात काही ठिकाणी बेकरीच्या नावाखाली, राजकीय पक्षाच्या पदाच्या नावाखाली आणि शहरात कपडे इस्त्रीचे दुकान,हॉटेलसह जागोजागी टेबल लावून मटका घेतला जातो.शहरासह तालुक्यात अवैध दारू विक्रीने तर कहरच केला असून खेड्यापाड्यासह शहरात ठिकठिकाणी राजरोसपणे देशी-विदेशी दारू,रसायन मिश्रित शिंदी, हातभट्टी विक्री होत असल्याचे नागरिकांकडू पोलिसात वेळोवेळी करण्यात आलेल्या तक्रारी निवेदनावरून स्पष्ट कळते.शहरात वाढत असलेली अवैद्य वाहतूक,शहरापासून लांब अनेक ठिकाणी चालू असलेले पत्याचे डाव,आदी धंद्याकडे पोलिसांनी केलेली डोळेझाक कशासाठी ? अशा अवैद्य धंदे चालकांच्या डोक्यावर आशीर्वाद व पाटीवर शाबासकीची थाप कोणाची असेल असा सवाल उपस्थित केला जात आहे.
सदरील अवैध धंदे बंद करून तालुक्यात चालू असलेले अवैद्य गोरखधंदे तात्काळ बंद न केल्यास येत्या १२ ऑक्टोंबर रोजी तालुक्यातील भीमटायगर सेना, कोळी महादेव संघटना, मी वडार महाराष्ट्राचा संघटना, ऑल इंडिया पँथर,एमआयएम , प्रहार पक्ष, राष्ट्रिय लोकजनशक्ती पार्टी आदी सामाजिक संघटना, पक्षाच्या वतीन रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करणार असल्याचे उपविभागीय अधिकारी भोकर, अप्पर पोलीस अधीक्षक,तहसिलदार , उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरिक्षक,राज्य उत्पादन शुल्क अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे.
निवेदनात भीम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष मिलिंद गायकवाड, राष्ट्रिय लोक जनशक्ती पार्टीचे तालुकाध्यक्ष म. मजरोद्दिन म. शफियोद्दिन, कोळी महादेव संघटनेचे तालुकाध्यक्ष सिध्देश्वर पिटलेवाड, एमआयएम तालुकाध्यक्ष सय्यद जूनेद पटेल, मी वडार महाराष्ट्राचा मराठवाडा उपाध्यक्ष निळकंठ वर्षेवार, ऑल इंडिया पँथर तालुकाध्यक्ष निखिल हंकारे, प्रहार पक्षाचे तालुकाध्यक्ष ॲड. शेखर कुंटे आदींसह विविध पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक संघटनेचे पदाधिकारी,कार्यकर्ते, तालुक्यातील असंख्य सुज्ञ नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
माजी पालकमंत्री अशोक चव्हाण यांचे
अवैद्य धंद्याबाबद आश्वासन ठरले फोल
राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे भोकर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून येताच मतदारांचे आभार व्यक्त करतांना विराट सभेत जाहिरपणे आपल्या मतदारसंघात रोजगार उपलब्ध करून देऊ तसेच कोणत्याही स्वरूपाचे अवैध धंदे चालू देणार नाही व अवैध धंदेवाल्यांची गय केली जाणार नाही असे आश्वासन दिले होते .परंतू मतदारसंघात सुशिक्षीत बेरोजगारांना रोजगार तर उपलब्ध झालाच नाही मात्र अवैध धंदे राजेरोसपणे तेजीत चालत असल्याचे चित्र पाहावयास मिळते . यामुळे अवैध धंद्यांबाबत चव्हाणांनी दिलेले आश्वासन फोल ठरले आहे आणि मतदारसंघातील मतदारांची अपेक्षा भंग झाल्याने नाराजगी व्यक्त होत आहे.
कोकाटे साहेब तालुक्यातील तरुणाईला
बरबादी पासून वाचवा ; सुज्ञ नागरिकांची मागणी
भोकर तालुक्यात मटका, जुगार , अवैध रसायनमिश्रीत शिंदी,देशी- विदेशी दारू,गांजा , प्रतिबंधीत गुटखा आणि अवैध प्रवासी वहातूक आदी अवैध धंदे जोमाने सुरू असल्याच्या तक्रारी अनेकवेळा पोलीस निरीक्षक यांच्याकडे प्राप्त झाल्या आहेत . यामुळे पोलीस दलाची बदनामी होत असल्याने मिळालेल्या तक्रारीवरून भोकर पोलिसांकडून अवैध धंद्यांविरोधात कडक भुमीका घेतली जात नसुन मागील कांही दिवसांत रसायन मिश्रित शिंदी ने अनेक युवक मरण पावले आहेत. अशा अवैध व्यावसायिकांविरुद्ध धडक कार्यवाहीची मोहीम भोकर शहरासह तालुक्यात राबवून अवैध धंद्यांवर आळा घालावा व मटका ,जुगार , दारू, गुटखा आदी व्यसनाच्या आहारी जाऊन हजारो सुक्षिक्षित बेरोजगारांच्या पिढया बरबाद होण्यापासून वाचवाव्यात अशी आर्त हाक तालुक्यातील सुज्ञ नागरीकांतून होत आहे .