लातूर : राजकारण, समाजकारण आणि शिक्षण यांचा त्रिवेणी संगम असलेले लोकराजा राजर्षी शाहू महाराज हे खरे अर्थाने भारताच्या सामाजिक परिवर्तनाचे शिल्पकार होते. महाराष्ट्राच्या मातीत ज्या थोर पुरुषांनी सामाजिक समतेचा आणि न्यायाचा दीप प्रज्वलित केला, त्यात अग्रक्रमाने नाव घेतले जाते ते राजर्षी शाहू महाराज यांचे. त्यांनी बहुजन समाजाच्या उत्थानासाठी आयुष्य वेचले. त्यांच्याच कार्याला उजाळा देत भिक्खू पय्यानंद थेरो यांनी लातूरमध्ये शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त झालेल्या भव्य कार्यक्रमात ठामपणे मागणी केली की, “राजर्षी शाहू महाराज यांना मरणोत्तर भारतरत्न सन्मानाने गौरविण्यात यावे.”
आजच्या दिवशी लातूर शहर साक्षीदार ठरले एका वैचारिक आणि सांस्कृतिक जागृतीच्या मिरवणुकीचे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून निघालेल्या या भव्य दिव्य मिरवणुकीने समतेचा झेंडा हाती घेतला होता. ज्येष्ठ नागरिक विचार मंच आणि शाक्य सिंह माता भिमाई सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कर्मचारी संघटनेच्या संयुक्त विद्यमाने ही मिरवणूक आयोजित करण्यात आली होती.
मिरवणूकीची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण आणि त्रिसरण-पंचशीलने झाली. त्यानंतर राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सामूहिक अभिवादन करण्यात आले.
भिक्खू पय्यानंद थेरो पुढे बोलताना म्हणाले की, “शाहू महाराज हे केवळ एक शासक नव्हते, तर ते समाजमनाचे शिल्पकार होते. १९०२ मध्ये ५०% आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय त्यांनी घेतला. शिक्षण हेच परिवर्तनाचे साधन आहे हे ओळखून त्यांनी मोफत शिक्षण, विद्यार्थी वसतीगृहे, रुग्णालये आणि सामाजिक संस्थांची उभारणी केली.”
“आज भारतात अनेकांना भारतरत्न मिळाले, पण ज्यांनी लाखो-कोटींच्या जीवनात उजेड आणला अशा शाहू महाराजांचा अद्याप गौरव झालेला नाही. म्हणूनच आम्ही भारत सरकारकडे मागणी करतो की त्यांना मरणोत्तर देशाचा सर्वोच्च पुरस्कार भारतरत्न देण्यात यावा.”
तसेच, त्यांनी सुचवले की शाहू महाराजांची जयंती ही फक्त एक साजरी करणारी तारीख न राहता, सामाजिक प्रेरणेचा दिवस व्हावा. यासाठी एक दिवसाची सार्वजनिक सुट्टी जाहीर व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
हा कार्यक्रम केवळ एक मिरवणूक नव्हती, ती होती इतिहासाच्या न्यायासाठीचा जागर. लोकशाही, समता, शिक्षण, आरक्षण यांसाठी ज्यांनी सर्वस्व अर्पण केले त्या शाहू महाराजांच्या स्मृतींना एक सामूहिक वंदना होती.
या प्रसंगी केशव कांबळे, सूर्यभान लातूर कर, त्र्यंबक कवठेकर, मोहन सोनकांबळे, राहुल शाक्यमुनी, मिलिंद धावारे ई. सह धम्म सेवक ग्रुपच्या सर्व सदस्यांची उपस्थिती होती.