• आरक्षणाचे प्रारूप १४ ऑक्टोबरला होणार प्रसिद्ध
• १७ ऑक्टोबरपर्यंत हरकती व सूचना सादर करता येणार
लातूर, दि. ९ (जिमाका): जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य पदाच्या आरक्षण निश्चितीसाठी जिल्ह्यात १३ ऑक्टोबर २०२५ रोजी आरक्षण सोडतीचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सभापती पदासाठी आरक्षण सोडत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात १३ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता होईल. तसेच पंचायत समिती सदस्य पदाची आरक्षण सोडत संबंधित तालुक्याच्या ठिकाणी निश्चित केलेल्या ठिकाणी याच दिवसी सकाळी ११ वाजता होणार आहे. तरी जिल्हा परिषद अथवा पंचायत समितीतील ज्या रहिवाशांची आरक्षण सोडतीच्या सभेस उपस्थित राहण्याची इच्छा आहे, त्यांनी या आरक्षण सोडत सभेस उपस्थित राहण्याचे अवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले आहे.
राज्य शासनच्या ९ सप्टेंबर, २०२५ रोजीच्या अधिसुचनेनुसार लातूर जिल्हा परिषद अंतर्गत पंचायत समिती सभापती पदासाठी अनुसूचित जाती प्रवर्गासाठी एक, अनुसुचित जाती प्रवर्गातील महिलेसाठी एक, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी (विमुक्त जाती व भटक्या जमातीसह) एक, नागरिकांचा मागास प्रवर्गातील (विमुक्त जाती व भटक्या जमातीसह) महिलेसाठी दोन, सर्वसाधारण प्रवर्गासाठी तीन, सर्वसाधारण प्रवर्गातील महिलेसाठी दोन असे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार आरक्षण सोडत होईल.
जिल्ह्यात १३ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता लातूर पंचायत समिती सदस्य पदाची आरक्षण सोडत लातूर पंचायत समितीमधील तिसऱ्या मजल्यावरील सभागृहात, औसा पंचायत समिती सदस्य पदाची आरक्षण सोडत औसा तहसील कार्यालय परिसरातील प्रशासकीय इमारतीमधील सभागृहात, रेणापूर पंचायत समिती सदस्य पदाची आरक्षण सोडत रेणापूर पंचायत समितीच्या बैठक सभागृहात, अहमदपूर पंचायत समिती सदस्य पदाची आरक्षण सोडत अहमदपूर येथील नवीन प्रशासकीय इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील बैठक हॉलमध्ये, चाकूर पंचायत समिती सदस्य पदाची आरक्षण सोडत चाकूर पंचायत समिती सभागृहात, उदगीर पंचायत समिती सदस्य पदाची आरक्षण सोडत उदगीर येथील हावगीस्वामी महाविद्यालय जवळील शासकीय विश्रामगृह येथील बैठक हॉलमध्ये, जळकोट पंचायत समिती सदस्य पदाची आरक्षण सोडत जळकोट प्रशासकीय इमारतीमध्ये, निलंगा पंचायत समिती सदस्य पदाची आरक्षण सोडत निलंगा तहसील कार्यालय येथील तिसऱ्या मजल्यावरील बैठक सभागृहात, शिरूर अनंतपाळ पंचायत समिती सदस्य पदाची आरक्षण सोडत शिरूर अनंतपाळ तहसील कार्यालय येथे आणि देवणी पंचायत समिती सदस्य पदाची आरक्षण सोडत देवणी पंचायत समिती सभागृहात होईल.
जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षणाचे प्रारूप १४ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रसिद्ध केले जाईल. या जिल्हा परिषद व पंचायत समित्यामधील निवडणूक विभागाच्या (गट) प्रारुप आरक्षणाबाबतच्या हरकती व सूचना जिल्हाधिकारी यांचेकडे आणि पंचायत समिती निर्वाचक गणाच्या (गण) प्रारुप आरक्षणाच्या हरकत व सूचना संबंधित तालुक्याचे तहसिलदार यांच्याकडे १४ ते १७ ऑक्टोबर, २०२५ या कालावधीत दाखल करता येतील, असे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
*****