संपादकीय...
कोरोना हटावासाठी कलगीतुरा कशाला
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने कोरोना कोविड हाटावासाठी लॉकडाउन व सामाजीक अंतराचे भान ठेवून देशभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना करुन अभिवादन करण्यात आले. आंबेडकरी जनता कार्यकर्त्यासह लोकप्रतिनिधीनीही बाबासाहेबाना अभिवादन करुन तुम्ही दिलेल्या शिकवणीनुसार तुमच्या विचारानेच पुढील मार्ग स्विकारुन तुमचे राहिलेले स्वप्न आम्हीच साकार करु आणि करणारच अशी ग्वाहीही आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते व दलित मागासवर्गीय समाजातील सर्वपक्षीय आमदार,खासदार,राज्य सरकार व केंद्र सरकार मधील मंत्री महोदयानी दिली असेल, यात संदेह नसावा. कारण या व त्या सर्वाच्या नसा नसात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे म्हणा किंवा त्या विचार प्रेरणेतील रक्त सळसळत असेल म्हणूनच हे सर्वचन अभिमान स्वाभिमान जागृत ठेवून ताठ मानेने जगताना वावरताना दिसतात. हेही नसे थोडके. म्हणूनच वर्षातून एकदातरी सामुहिकरित्या एकत्रित येवून एकमेकात मिसळून आंबेडकरवादाच्या गप्पा मारता येतात. हे नेहमीचेच ठरलेले गणित असते. पण कोविड १९ विषारी संसर्गजन्य रोग हटाव मोहिमेला अडसर ठरु नये म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपापल्या घरी साजरी करण्याचा निर्णय लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते व केंद्र व राज्य सरकारने घेतला. आणि कार्यकर्ते लोकप्रतिनिधीच्या आंबेडकरवाद या विषयावरील खमंग चर्चा गुलदस्त्याच राहिली. आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते लोकप्रतिनिधी हताश मनाने घरातच स्थिरावले. पंरतू डॉ. बाबासाहेब आंबेडकर मात्र अशा या सर्वावर त्यांच्या घडामोडीवर बदलत्या समाजकारण राजकारणासह शासकीय प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करुन पाहत असताना दिसतात. यातच आपणा सर्व भारतीयांचे भाग्य समजावे असे म्हणने समजण्यात कांहीच हरकत नसावी अशीच लोकभावना व्यक्त होत असेल तर आश्चर्य कसले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात देशभरातील राज्य शासने व केंद्र सरकार ही मागे राहिले नाही. केंद्र व महाराष्ट्र सरकारचे उदाहरण म्हणून पाहिले तर प्रधान मंत्री नरेंद्र मोदी, राष्ट्रपती, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, राज्यपाल केंद्र व राज्य सरकार मधील अनेक मंत्री खासदार आमदारांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित भारतीय राज्य घटनेमुळे देशात सामाजीक न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधू भाव आणि हक्क आबाधीत आहे, हेच आपले भाग्य आहे. धर्मनिरपेक्षता व लोकशाही मुल्याची जपवणूक करुन संविधानानुसार कार्यरत राहावे हा बाबासाहेबांचा संदेश आणि त्यांची भारत हा अखंड आणि एकजुड राहिला पाहिजे, ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मुलमंत्र, तत्वज्ञान हेच आपले अधिष्ठान आहे. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करुन संविधाना प्रमाणे व बाबासाहेबांनी घालून दिलेल्या मुलमंत्र तत्वज्ञान धोरणानुसारच कार्यरत राहू हीच बाबासाहेबाना आतराजंली ठरेल असे स्पष्ट विधान केंद्र व राज्य सरकार मधील पंतप्रधान, राष्ट्रपती, मुख्यमंत्री, मंत्री, लोकप्रतिनिधीने केले. आणि लगेच कोरोना हटावाच्या लढाईसाठी आपापल्या जागेवर जावून बसले. याचे ही पडसाद उमटताना दिसत आहेत. असेच चित्र दिसते आहे.
कोरोना हटावाची लढाई जोरात चालू आहे. वैद्यकीय अधिकारी जिव ओतून उपचार करीत आहेत. पोलीस यंत्रणा देखरेख व गस्त घालीत आहे. जनता काटेकोरपणे लॉकडाउनचे पालन करीत असल्याने कोरोना हद्दपार होणारच असे प्रधान मंत्री नरेंद्र मोदी म्हणतात. तर कोवीडचा पाडाव करणेसाठी औषधी साठा, धान्य साठा मुबलक आहे. कोरोना स्थितर असून त्याचे निर्मूलन होईल असे केंद्रिय गृहमंत्री अमित शहा म्हणतात, तर दुसरीकडे आर्थिक मदत कोठे आहे, कोणाला दिली जातेय, याचा ठावठिकाणा नसल्याने मोदी सरकार जनतेची दिशाभुल करीत असल्याचा आरोप कॉंग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहूल गांधी यानी केला. तर लॉकडाउन वाढविले हे ठिकच पण... धान्यसाठा पैसा असताना तो केंद्र सरकार वापरत नाही. पुरवठा करीत नाही, गोरगरीब अन्नासाठी रस्त्यावर येवून याचना करीत असताना नरेद्रं मोदी हे आश्वासनात गर्क असल्याची टिका कॉंग्रेसचे माजी केंद्रिय मंत्री पि चिदम्बरम यांनी केले. तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचेसह आरोग्य मंत्री गृहमंत्री व त्या त्या जिल्ह्याचे पालक मंत्री हे सर्वसामान्य जनतेसह जिवनावश्यक वस्तू व कोरोनाग्रस्तानी कोविड बाधीतांना योग्य ते औषधी उपचार चालू आहेत, पुरवठा करीत आहेत. असे सांगत असले तरी कोरोना कोविड हटाव मोहिम प्रकर्षाने राबवून महाराष्ट्रासह देश कोविड मुक्त करणे ऐवजी भाजपा-कॉंग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात व पक्ष नेते कलगीतुरा करुन एकमेकाचे हासू करुन घेत असले तरी कोरोनाग्रस्त व कोरोना बाधीत रुग्णासह टाळेबंदीत अडकलेल्या स्त्रि-पुरुषाच्या डोळ्यातून आसू वाहत आहेत. हे राजकीय पक्ष नेत्यांना किंवा लोकप्रतिनिधीना दिसत नसल्याने ते आसू कलगीतूर्यातून पुसणार नाहीत, किंवा कोविड हद्दपार होणार नाही, त्यासाठी लोकप्रतिनिधीने वृत्तीकृतीत बदल करुन उपाय योजना राबवाव्यात, कलगीतूरा करु नयेत, हीच लोकभावना व्यक्त होताना दिसते आहे.