लातूर/प्रतिनिधी : दिनांक २८ डिसेंबर २०२५ रोजी लातूर शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने मतदान प्रक्रियेतील जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या बूथवरील केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांचे अनिवार्य प्रशिक्षण सिद्धेश्वर व रत्नेश्वर सभागृह येथे आयोजित करण्यात आले होते.
मात्र सदर प्रशिक्षणास दांडी मारणाऱ्या एकूण २६५ अधिकारी व कर्मचारी यांच्यावर निवडणूक नियमांनुसार नोटीस बजावण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे. नोटीस प्राप्तीनंतर संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून समाधानकारक खुलासा प्राप्त न झाल्यास, शिस्तभंगाची व फौजदारी स्वरूपाची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.ही माहिती उपायुक्त (निवडणूक) श्री. पंजाबराव खानसोळे यांनी दिली असून, निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, शिस्तबद्ध व कायदेशीर पद्धतीने पार पडावी यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
............