लातूर, दि. १४ : लातूर शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनिमित्त १५ जानेवारी २०२६ शांतता, निर्भयता आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अंतर्गत आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार लातूर शहरातील सर्व मतदान केंद्रांपासून २०० मीटर परिसरात विविध प्रतिबंध लागू करण्यात आले आहेत.
राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमानुसार महानगरपालिका निवडणुकीसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार मतदान सुरू झाल्यापासून ते मतदान संपेपर्यंत मतदान केंद्र परिसरात प्रतिबंध लागू राहतील. मतदान केंद्रापासून २०० मीटर परिसरात मंडपे, दुकाने किंवा तात्पुरत्या रचनांचे उभारणे पूर्णपणे प्रतिबंधित राहील. मोबाईल फोन, स्मार्ट फोन, कॉर्डलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्वनीक्षेपक (लाउडस्पीकर) व इतर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक उपकरणे बाळगणे किंवा वापरणे यावर बंदी राहील. निवडणूक कामाशी संबंधित नसलेली खाजगी वाहने आणणे,
संबंधित पक्षाचे चिन्हे प्रदर्शित करणे, निवडणूक कामाशी संबंधित नसलेल्या व्यक्तींना मतदान केंद्र परिसरात प्रवेश करण्यास मनाई राहील.
हे आदेश फक्त मतदान दिवशी सकाळी मतदान सुरू होण्यापासून ते संपूर्ण मतदान प्रक्रिया संपेपर्यंत अंमलात राहतील. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
लातूर शहर महानगरपालिका निवडणूक
मतदान केंद्र संख्या - 375
मतदान पथके 375
राखीव मतदान पथके 41
एकूण कर्मचारी संख्या: 1875
पोलीस कर्मचारी संख्या: 375
एकूण: 2250
आदर्श मतदान केंद्र: 6
सखी मतदान केंद्र: 3
पर्यावरण पूरक मतदान केंद्र: 2