औसा मतदारसंघातून पंतप्रधान सहाय्यता निधीस साडेअकरा लाखाचा निधी
मुस्लिम समाजाकडूनही उस्फुर्त मदत, दानशूरांनी दिले ९६ हजार रुपये
औसा/ प्रतिनिधी :कोरोनाच्या पार्श्वभूमीवर औसा विधानसभा मतदारसंघातील नागरिकांनी पंतप्रधान सहाय्यता निधीस ११ लाख ३५ हजार ७०५रुपयांचा निधी जमा केला. विशेष म्हणजे मुस्लिम समाजातील दानशूरांनीही सढळ हाताने मदत केली. समाजाच्या वतीने ९६ हजार ७०३ रुपये सहाय्यता निधी देण्यात आला .औशाचे आ. अभिमन्यू पवार यांनी या संकटकाळात सर्व जनतेकडून आपल्या परीने जमेल तशी मदत करण्याचे आवाहन मतदारसंघातील जनतेला केले होते.या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.
कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान सहाय्यता निधीला मदत करावी ,असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून करण्यात आले होते. त्यांच्या आवाहनास प्रतिसाद देत औसा मतदारसंघातील जनतेने सढळ हाताने मदत केली.मतदारसंघातील जवळपास सर्वच गावातून निधी जमा झाला. औसा शहरातून एक लाख १ लाख ४८ हजार ३२२ रुपये पंतप्रधान सहाय्यता निधीस देण्यात आले. तालुक्यातील मुस्लिम बांधवांनी ६५ हजार ८०३ रुपयांची मदत केली. औसा तालुक्यातून नागरिकांनी ५ लाख ३४ हजार १४७ रुपये निधी जमा केला. तालुक्यातून एकूण ७ लाख ४८ हजार २७२ रुपये पंतप्रधान सहाय्यता निधीस देण्यात आले. औसा मतदारसंघात परंतु निलंगा तालुक्यात असणाऱ्या ६८ गावातुन एकूण ३ लाख ८७हजार ४३३ रुपये मदत करण्यात आली. यात ३ लाख ५६हजार ५३३ रुपये नागरिकांकडून व मुस्लिम समाजाकडून ३० हजार ९०० रुपये मदत म्हणून देण्यात आले. औसा तालुका व निलंगा तालुक्याचा एकत्रित ११ लाख ३५ हजार ७०५ रुपये निधी पंतप्रधान सहाय्यता निधीत जमा करण्यात आला.राष्ट्रीय आपत्तीच्या वेळी मुस्लिम समाज खंबीरपणे सर्वांच्या सोबत उभे असल्याचे औसा मतदारसंघातील समाज बांधवांनी दाखवून दिले. समुदायाच्या वतीने एकूण ९६ हजार ७०३ रुपयांचा निधी देत आपणही मदत कार्यात मागे राहणार नसल्याचे या समाजाने दाखवून दिले. मतदारसंघातील लहानमोठे व्यापारी,महिला बचतगट व सर्वसामान्य नागरिकांनी सुध्दा मदतीचा हात पुढे केला आहे.जनतेतून मिळालेल्या या प्रतिसादाबद्दल आ.अभिमन्यू पवार यांनी आभार व्यक्त केले आहेत.
एकंदरीत कोरोना काळातही मतदारसंघात प्रभावी उपाययोजना कशा राबवता येतील यासाठी सतत प्रयत्नशील असणारे आ. अभिमन्यू पवार यांच्या आवाहनाला जनतेतून सुध्दा चांगला प्रतिसाद मिळत आहे.