*मुंबई :* पुढील २४ तासांत कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. या कालावधीत रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांत मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी काही भागांत १०० ते १५० मिमी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
राज्यात सध्या पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. याचबरोबर पूर्व-मध्य अरबी समुद्रात उत्तर कर्नाटक आणि गोव्याच्या किनारी भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे. वाऱ्यांच्या प्रभावामुळे या भागात गुरुवारी कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. त्यानंतर ही स्थिती उत्तरेकडे सरकताना तीव्रता वाढण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. याचाच परिणाम म्हणून पुढील दोन दिवस कोकण, घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. अनेक ठिकाणी वेगवान वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांतही ४० ते १२० मिमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून, घाटमाथ्यालगतच्या भागांमध्ये सरी अधिक तीव्र असतील. पावसामुळे नद्या आणि नाल्यांची पाणी पातळी वाढू शकते, तसेच काही भागांत वाहतुकही विस्कळीत होण्याची शक्यता आहे. मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेऊन हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. डोंगराळ भागांमध्ये भूस्खलनाचा धोका संभवत असल्यामुळे अनावश्यक प्रवास टाळावा, असेही सांगण्यात येत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पावसाचा जोर पुढील दोन दिवस राहण्याची शक्यता असून, काही भागांत विजांसह जोरदार सरी पडण्याचीही शक्यता आहे.
*मुंबईत मुसळधार*
मुंबईत बुधवारी रात्री ११ वाजल्यानंतर मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. काही भागात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळत होता. परळ, वरळी, दादर, बोरिवली, कुर्ला या परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली. याचबरोबर नवी मुंबईतही जवळजवळ एक तास मुसळधार पाऊस पडला.
*पावसाचा दणका*
मागील तीन दिवसांपासून राज्यात वळीवाच्या पावसाने जोर धरला असून कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी अतिवृष्टीचीही नोंद झाली आहे. अनेक भागात पाणी साचले असून पिकांचे नुकसानही झाले आहे.
*नैऋत्य वाऱ्यांनी श्रीलंकेचा बहुतांश भाग व्यापला*
नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी बुधवारी दक्षिण अरबी समुद्र, मालदीव आणि कोमोरीन, तसेच बंगालच्या उपसागराचा आणखी काही भाग आणि श्रीलंकेचा बहुतांश भाग व्यापला आहे. येत्या रविवारपर्यंत मोसमी वारे केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. यंदा सर्वसाधारण वेळेच्या तब्बल पाच दिवस आधी १३ मे रोजी मोसमी वारे निकोबार बेटे, दक्षिण अंदमान समुद्र आणि दक्षिण बंगालच्या उपसागरात दाखल झाले आहेत.
*आज पावसाचा अंदाज कुठे*
*गडगडाटासह वादळी पाऊस –* मुंबई, ठाणे, पालघर, धुळे, नंदूरबार,जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, सातारा, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर.
*मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस –* रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे आणि कोल्हापूर.
*सोसाट्याचा वारा, विजांसह पाऊस –* अकोला, अमरावती, बुलढाणा, नागपूर, वाशिम आणि यवतमाळ.