परराज्यातून/ परजिल्हयातून येणार्या व्यक्तींच्या
संदर्भात प्रतिबंधात्मक आदेश जारी
लातूर (जि.मा.का) जिल्हयाच्या कार्यक्षेत्रात कोरोना कोव्हीड-१९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करणे आवश्यक आहे त्या करण्यासाठी सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष जी. श्रीकांत यांनी जिल्हयातील नागरिक परराज्यातून/ परजिल्हयातून मोठया संख्येने जिल्हयात सक्षम प्राधिकारी यांच्या परवानगीने येत असून अशा नागरिकांबात पुढील प्रमाणे कार्यवाही करणेचे आदेश जारी केले आहेत.
लातूर जिल्हयाच्या (Boarders) सीमांवर पोलीस, होमगार्ड, संबंधित तलाठी, ग्रामसेवक, जि.प. शाळेचे शिक्षक, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था, लातूर येथील इंटर्न विद्यार्थी ई.चे पथक शिफ्टनिहाय तैनात करण्यात यावे. जिल्हयाच्या चेकपोस्टसवर पोलीस विभागासोबत तलाठी, ग्रामसेवक, जि.प. शिक्षक ई.ची नियुक्ती संबंधित उपविभागीय अधिकारी यांनी करावी.
या पथकात वैद्यकीय इंटर्न विद्यार्थी यांची शिफ्टनिहाय नियुक्तीची कार्यवाही अधिष्ठाता, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था, लातूर यांनी करावी. लातूर जिल्हयातील नागरिक जे परराज्यातून / परजिल्हयातून सक्षम प्राधिकारी यांच्या परवानगीने / (काही अपरिहार्य कारणास्तव विनापरवानगी ) जिल्हयात येत आहेत. अशा नागरिकाकंची जिल्हयाच्या सीमेवर तैनात असलेल्या पथकाने थर्मल स्क्रीनिंग करुन संबंधितास १४ दिवसासाठी घरात विलगीकरण (Home Quarantine ) हेाण्याबाबत सक्त सुचना देऊन तसा शिक्का संबंधिताच्या दोन्ही हातावर मारण्यात यावा.
बाहेरुन आलेले असे व्यक्ती त्यांच्या घरात विलगीकरणात राहतील याची दक्षता ग्रामपातळीवरील कृती समितीने घ्यावी. घरात विलगीकरण (Home Quarantine ) केलेल्या व्यक्तीने कोणत्याही परिस्थितीत घराच्या बाहेर जाऊ नये. अशा व्यक्ती सुचना देऊनही घराच्या बाहेर आल्यास संअंधितांकडून रु. १०००/- इतके दंड वसूल करण्यात येईल.
या आदेशाचे उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ५१,५५ तसेच साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ अन्वये दिलेल्या तरतुदीनुसार भारतीय दंड संहिता, १८६० चे कलम १८८ नुसार तसेच महाराष्ट्र कोव्हीड-१९ उपाययोजना नियम, २०२० च्या तरतुदीनुसार कार्यवाही करण्यात येईल याची दक्षता घ्यावी. असे ही आदेशात नमुद केले आहे.