शेतक-यांनी सोयाबीनचे घरचेच बियाणे वापरण्याचे आवहान
लातूर,(जिमाका) : जिल्ह्यात खरीप हंगामात मुख्यतः सोयाबीन 4,10,000 हे., तूर 90,000 हे., ख.ज्वारी 25,000 हे., मुग 14,000 हे., उडीद 12,000 हे. कापुस 10,000 हे. व इतरपिके 29000 हे. या प्रमाणे एकुण 590000 हे क्षेत्रावर लागवड करण्यात येते.
जिल्ह्यात येत्या खरीप हंगामासाठी सोयाबीन पिकाचे 4,14,000 हे. क्षेञ प्रस्तावीत असुन सदर क्षेञासाठी प्रति हेक्टर 65 किलो या प्रमाणे एकुण 2,69,100 क्विं. बियाण्याची गरज आहे. जिल्ह्यात या खरीप हंगामात 8,600 हेक्टर क्षेञावर बिजोत्पादन कार्यक्रम प्रस्तावीत असुन या क्षेञासाठी आवश्यक 5,590 क्विं. पायाभुत बियाणे संबंधीत बिजोत्पादन कंपण्याकडुन प्राप्त होणार आहे.
बिजोत्पादन कार्यक्रमाखाली प्रस्तावीत क्षेञ व त्यासाठी उपलब्ध होणारे पायाभुत बियाणे वगळता उर्वरीत 4,05,480 हेक्टर क्षेञासाठी 2,63,562 क्विं. बियाण्याची आवश्यकता आहे. यापैकी शासनाकडुन सार्वजनिक क्षेञातील महाबीज या कंपनीचे 54,000 क्विं. व राष्ट्रीय बीज निगम या कंपनीचे 3,000 क्विं. याप्रमाणे सार्वजनिक क्षेञातील कंपन्याकडुन एकुण 57,000 क्विं. बियाण्याचे आवंटन मंजुर केलेले आहे. तसेच जिल्ह्यात खाजगी क्षेञातील 14 कंपण्याकडुन 62,565 क्विं. तसेच जिल्ह्यातील स्थानिक शेतकऱ्यांच्या उत्पादक कंपण्याकडुन 8,000 क्विं. बियाणे उपलब्ध होणार आहे.
जिल्ह्यात शासकीय, खाजगी,व शेतकऱ्यांच्या कंपन्या या माध्यामातुन एकुण 1,27,565 क्वि. बियाणे उपलब्ध होणार आहे. या प्रमाणे जिल्ह्यास एकुण 4,05,480 हेक्टर क्षेञासाठी आवश्यक 2,63,562 क्विं. बियाण्यापैकी उपरोक्त प्रमाणे उपलब्ध होणारे 1,27,565 क्विं. वजा जाता उर्वरीत आवश्यक 1,35,997 क्विं. च्या तुलनेत शेतकऱ्यांकडे (स्वतः कडे, गावातील इतर शेतकरी तसेच बाजुच्या गावाचे शेतकरी) एकुण 2,04,606 क्विं. बियाणे उपलब्ध आहे. जिल्ह्यामध्ये जिल्ह्याच्या येत्या खरीप साठी आवश्यकतेपेक्षा 68,609 क्विं. जादाचे बियाणे उपलब्ध आहे.
जिल्ह्यामध्ये मागील वर्षीच्या खरीप हंगामात पेरणीच्या कालावधीत पाऊस न झाल्याने लातूर व औसा या तालुक्यातील कांही मंडळामध्ये सोयाबीन पिकाची पेरणी न झाल्यामुळे तसेच इतरही कांही तालुक्यामध्ये पेरणी कमी प्रमाणात झाल्याने तसेच ऐनकाढणीच्या हंगामात परतीचा जादा प्रमाणात पाऊस झाल्याने बऱ्याच शेतकऱ्यांकडे वैयक्तीक स्वरुपात पेरणीयोग्य बियाणे नाही, ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. बऱ्याचशा शेतकऱ्यांकडे स्वतःचे घरचे बियाणे उपलब्ध नसल्याने असे शेतकरी त्यांना बाजारात वेगवेगळ्या कंपन्याचे उपलब्ध बियाणे होईलच किंबहुना ती शासनाची जबाबदारी आहे अशी अपेक्षा ठेउन आहेत.
शासनाने जिल्ह्यासाठी साधारणपणे मागील कांही वर्षातील शेतकऱ्यांनी केलेली खरेदी (87,216 क्विं.) तुलनेत 1,27,565 क्विं. (46% जास्त) एवढे (सरासरी विक्रीच्या दीडपट) बियाणे उपलब्ध केलेले आहे. जिल्हात सोयाबीन करणाऱ्या बहुतांश जिल्ह्यामध्ये काढणीच्या हंगामात जादाचा पाऊस झाल्याने बहुतांश शेतकऱ्यांकडील सोयाबीनचं उत्पादन खराब झालेले आहे. सहाजीकच शासकीय व खाजगी उत्पादकांचे सोयाबीन बियाण्याचे प्लॉट्स सुद्धा खराब झालेले आहेत. अशा परिस्थितीत शासन आणखीनही जादाचे बियाणे देणार कुठुन? यासाठी सर्वात चांगला, सोपा, योग्य पर्याय आहेः- शेतकऱ्यांनी स्वतः कडील (स्वतः कडील याचा शब्दशः अर्थ न घेता स्वतः कडील म्हणजे प्राधान्याने स्वतःच्या शेतातील उत्पादतीत, ते शक्य नसल्यास गावातील इतर शेतकरी ज्यांच्याकडे भेसळ विरहीत, व्यवस्थीत जतन केलेलं, उगवण क्षमता चांगली असलेलं बियाणं आणि गावातही असे बियाणे उपलब्ध नसल्यास आजुबाजुच्या गावातील उपरोक्त प्रमाणे नमुद केल्यानुसार चांगल्या गुणवत्तेचं बियाणं उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांच बियाणं ) बियाणे वापरणे.
सर्वसाधारणपणे खरीप हंगामात पेरणी करण्यात येत असलेल्या सोयाबीन, तूर, ज्वारी, मुग, उडीद व कापुस या पिकापैकी एकतर सोयाबीन या एकाच पिकाचे क्षेञ सर्वात जास्त आहे. (खरीपातील एकुण पेरणी क्षेञ 5,90,000 हेक्टर पैकी 4,10,000 हेक्टर क्षेञ (70 %) एकट्या सोयाबीन पिकाखाली आहे. शिवाय सोयाबीन या पिकाच्या पेरणीसाठी प्रति हेक्टर बियाण्याची 65 किलो माञा ही खरीपातील इतर सर्वच पिकांच्या तुलनेत सर्वाधिक (तूर, मुग, उडीद-15 किलो, ज्वारी-10 किलो, कापुस-1.2 किलो) असुन खरीपात पेरल्या जाणाऱ्या सर्वच पिकापैकी सोयाबीन या पिकाच बियाणं हे अतिशय नाजुक आहे. सोयाबीनच्या बियाण्याचा EMBRIO च्या भागास कोणत्याही कारणाने इजा झाल्यास त्याच्या उगवणशक्तीवर परिणाम होतोच.
जिल्ह्साठी शासन सरासरी विक्री होत असलेल्या बियाण्याच्या दिडपट बियाणे उपलब्ध करत आहे, त्याही पेक्षा जास्तीचे बियाणे उपलब्ध करण्यावर मर्यादा आहेत, शेतकऱ्यांनी बाजारातील कंपन्यांचे जादा बियाण्याची मागणी केल्यास या कंपन्या काळाबाजार करणे, साठेबाजी करणे, योग्य गुणवत्ता नसलेलं किंवा कमी गुणवतेचं बियाणं विकण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता निर्माण होते.या सर्व पार्श्वभुमीवर शेतकऱ्यांनी स्वतः कडील बियाणे वापरण्याचा निर्धार केल्यास वरील अनेक अडचणीवर मात करणे शक्य आहे.
सर्वासाधारणपणे शेतकरी दरवर्षी त्यांना आवश्यक असणाऱ्या सोयाबिनच्या एकुण बियाण्यापैकी 35% बियाणे कंपन्यांचे बाजारातील खरेदी करतात. त्यांना लागणाऱ्या एकुण बियाण्यापैकी 65% बियाणे शेतकरी स्वतःकडचे वापरतातच. ही बाब मागील अनेक वर्षापासुनचे जिल्ह्याचे पेरणीचे क्षेञ व त्या तुलनेत बाजारातील कंपन्यांची बियाणे विक्रीची आकडेवारी पाहीली असता स्पष्ट होते. वैयक्तीक शेतकऱ्यांकडे माहीती घेतली असताही या बाबीला पुष्टी मिळते. उदा. एखादया शेतक-याला 4 एकर सोयाबीनची पेरणी करायची असल्यास तो त्यापैकी एक एकरसाठी आवश्यक एक बॅग बाजारातून कंपनीचे विकत आणतो, व उर्वरित तीन एकरामध्ये स्वतःच्या घरचे उत्पादित (मागील वर्षी एका एकर मध्ये याच पद्धतीने उत्पादन केलेल्या बियाण्यातुन) बियाणे पेरतो यामध्ये शेतकऱ्यांना हेही माहीत झालेले आहे की सोयाबीन हे पीक स्व परागसिंचित असल्याने व या पिकाचे बाजारातील उपलब्ध सर्वच वाण हे सरळ व सुधारित वाण असल्याने एकदा कंपनीच्या बाजारातील घेतलेल्या बियाण्यापासून उत्पादित बियाणे पुढील सलग दोन वर्षे वापरता येते. याप्रमाणे बियाणे वापरल्याने उत्पादनात कोणत्याही प्रकारे घट येत नाही. यामुळे शेतकऱ्यांचा बियाण्यावरील अनावश्यक खर्चही मोठ्या प्रमाणावर वाचतो.
शेतकरी दरवर्षी त्यांच्या एकूण गरजेच्या 65% बियाणे स्वतःकडील (त्याने मागील वर्षी उत्पादीत केलेल्या बियाण्यापासून उत्पादित) वापरतातच तथापि वर नमूद केल्याप्रमाणे मागील वर्षीच्या सोयाबीन बियाणे खराब झाल्याच्या पार्श्वभूमीवर बऱ्याचशा शेतकऱ्यांकडे “वैयक्तिक स्वरूपात” स्वतःचे घरचे बियाणे उपलब्ध नाही हे खरे आहे. तथापि असे सर्वच शेतकऱ्यांच्या बाबतीत घडलेले नाही हेही तितकेच खरे आहेत. सर्वसाधारणपणे गावातील सोयाबीन पिकाखालील एकूण क्षेत्राच्या 8% क्षेत्रावरील उत्पादित बियाणे जरी उपलब्ध झाले तरी गावासाठी आवश्यक संपूर्ण बियाण्याची गरज पुर्ण होते. जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये तेवढ्या प्रमाणात बियाणे उपलब्ध आहे. निश्चितच हे उपलब्ध असलेलं बियाणं व्यक्तिगत स्वरुपात प्रत्येक शेतकर्याकडे स्वतःचे स्वतः कडे उपलब्ध नाही. हे उपलब्ध असलेलं बियाणे हे गावातील काही ठराविक शेतकऱ्यांकडं, ज्यांची काढणी पावसापूर्वी झाली, ज्यांना बियाणे म्हणून विक्री करण्याचा मागील काही वर्षाचा अनुभव आहे अशा काही ठराविक शेतकऱ्यांकडे आहे. गावातील अशा शेतकऱ्यांकडून बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकरी तितकेसे उत्सुक नसतात. हे साहजिक पण आहे. शेतकऱ्यांचा सर्वात जास्त विश्वास हा बाजारातील कंपनीच्या बॅगमधील बियाण्यावर असल्याने त्यास तो प्रथम प्राधान्य देतो. तर तदनंतर दुसऱ्या क्रमांकावर भरोसा/विश्वास हा स्वतःच्या शेतात उत्पादन केलेल्या बियाण्यावर असतो कारण ते बियाणे त्यांनी स्वतःच्या शेतात उत्पादित केलेले असते. गावातील काही ठराविक शेतकरी, ज्यांची स्वतःची बियाण्याची गरज भागून इतरांना विकण्यासाठी उपलब्ध आहे. अशा शेतकऱ्यांवर गावातील शेतकरी सहजासहजी विश्वास ठेवायला तयार नसतात. अशा शेतकऱ्यांवर डोळे झाकून विश्वास ठेवावा अशी शासनाचीही अपेक्षा नाही. किंबहुना सदर बियाण्याच्या गुणवत्तेची खात्री करूनच खरेदी करणे अपेक्षित आहे.
बियाण्याच्या गुणवत्तेमध्ये प्रामुख्याने दोन भाग येतात.
1. आनुवंशिक शुद्धता व 2. उगवण क्षमता.
अनुवंशीक शुद्धता ही केवळ बियाणं डोळ्यांनी पाहून ठरविणे शक्य नाही. तथापि विकणारा शेतकरी हा बहुतांशी गावातीलच असल्याने तो फ़सवण्याची शक्यता नसते. अशा शेतकऱ्यांचे शेत ग़ावातच असल्याने इतरांच्या नजरेखाली असते. बियाणे म्हणून उत्पादन करणारा शेतकरी पुरेशी काळजी घेतच असतो. त्यामुळे खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांनी स्थानिक चौकशी करून याबाबत निर्णय घ्यावा लागेल.
उगवण क्षमता तपासणी मात्र प्रत्येक शेतकऱ्याने करून घेणे आवश्यक आहे. उगवण क्षमता तपासणे हे काम अतिशय सोपे आहे. शेतकरी स्वतःच्या घरचे उत्पादित बियाणे पेरणार असो की गावातील इतर शेतकऱ्यांकडील बियाण्यातून पेरणार असो की आजुबाजूच्या गावातील शेतकऱ्याकडील, यापैकी कोणतेही असो, त्याची उगवण क्षमता तपासणे आवश्यक आहे. मागील दीड महिन्यापासून कृषी विभागाचे क्षेत्रीय कर्मचाऱ्यामार्फत याबाबतची प्रात्यक्षिके घेण्यात येत आहेत. या माध्यमातून प्रशिक्षण घेऊन जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांनी आपल्या बियाण्याची उगवण क्षमता तपासून घेतलेली आहे. जे शेतकरी दुसऱ्या शेतकऱ्यांकडून बियाणे विकत घेणार आहेत, असे शेतकरी प्रत्यक्ष खरेदीपूर्वीही खरेदी करण्यात येणाऱ्या बियाण्यातून नमुना घेऊन उगवणक्षमता तपासू शकतात.
जिल्हयातील प्रत्येक शेतकऱ्याने त्यांना आवश्यक बियाण्यासाठी यापूर्वी सांगितल्याप्रमाणे डायरेक्ट बाजारातील कंपनीच्या बियाण्याची अपेक्षा न करता उगवणक्षमता तपासून प्राधान्याने स्वतःच्या घरचे उत्पादित, अडचण असल्यास गावातील इतर शेतकऱ्यांकडील आणि त्यातही अडचण आल्यास कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आजूबाजूच्या गावातील शेतकऱ्यांकडून बियाणे प्राप्त करून घेऊन वापरल्यास सर्वांचाच फायदा होणार आहे. वरीलप्रमाणे शेतकऱ्यांनी स्वतःकडील बियाणे वापरल्याने खालील नमूद केल्यानुसार फायदे होतात.
पहिला व सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे शेतकऱ्यांचा स्वतःचा बियाण्यावरचा खर्च कमी होणार आहे, वाचणार आहे. प्रत्येक बॅगमागे शेतकऱ्याचे रु. 900 ते 1 हजार 200 पर्यात खर्च वाचणार आहे.नंबर दोनचा सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे शेतकऱ्यांचा बियाण्यावर खर्च होणारा पैसा मुठभर कंपन्यांच्या खिशात जाण्याऐवजी बियाणे उत्पादन व विक्री करणाऱ्या आपल्याच काही शेतकरी बांधवाच्या खिशात जमा होईल. ज्याची सध्याच्या परिस्थितीमध्ये जास्त गरज आहे. तिसरा सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे ज्याप्रमाणे शेतकरी दुसऱ्या शेतकऱ्यावर, आपल्याच बांधवावर त्याच्या बियाण्यावर विश्वास टाकायला लागल्यास, भविष्यात अनेक शेतकरी व्यवसाय म्हणून बियाणे उत्पादन करतील, जी की काळाची गरज आहे आणि हेच शासनाचे धोरणपण आहे.
चौथा आणि सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे शेतकरी स्वतःला आवश्यक बियाणे स्वतः उत्पादित करू शकतात, करताहेत, यामध्ये काही अडचणी आल्यास शेतकरी गावातील, आजूबाजूच्या गावातील शेतकऱ्यांकडील बियाण्यावर विश्वास ठेवतात, विकत घेतात, पेरतात हा संदेश मोठ्या प्रमाणावर बियाण्याच्या बाजारात गेल्यास बियाणे उत्पादक, विक्रेते साठेबाजी करणे, काळाबाजार करणे, भेसळ करणे, जादा दराने विक्री करणे याबाबी करण्याची शक्यता संपून जाईल. ज्याप्रमाणे उत्पादक, विक्रेते आपल्याच मार्केटमधील अज्ञानाचा फायदा घेऊन जादा नफा कमावण्याचा प्रयत्न करतात त्याच्या उलट बाजूने आपण “मार्केटमधील बियाण्यास आमचा शेवटचा प्राधान्यक्रम राहणार आहे” असा संदेश मोठ्या प्रमाणावर पोहोचवल्यास मार्केटमधील अनेक अडचणी सुटणार आहेत, यामुळे आपण सोयाबीन बियाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होऊ शकु, यांची सध्याच्या काळात नितांत गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गवसाने यांनी एका प्रसिध्द पत्रकारद्वारे कळविले आहे.