लातूर (प्रतिनिधी) : शिव छत्रपती शिक्षण संस्था द्वारा संचलित, राजर्षी शाहू महाविद्यालयातील इयत्ता ११ वी विज्ञान शाखेत शिकत असलेली कु. ऋतुजा एडके या गरीब व होतकरू विद्यार्थिनीस रामलिंगेश्वतर फर्टिलायझर, लातूरचे श्री. सिद्राम चाकोते यांनी शैक्षणिक फीससाठी रु. ३०,०००/- (अक्षरी रुपये तीस हजार फक्त ) आर्थिक मदतीचा धनादेश महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे यांच्या कडे सुपूर्द केला. यावेळी श्री. विठ्ठल तळेकर, श्री. राजाभाऊ शिंदे, श्री. रोहित रत्नपारखे, श्री. दिलीप कुलकर्णी, प्रा. महेशकुमार जाधव, डॉ. पांडूरंग चंदनशिव, महाविद्यालयाचे अधिक्षक श्री. जगन्नायथ क्षीरसागर व श्री. मिलींद सोनकांबळे उपस्थित होते.
राजर्षी शाहू महाविद्यालयात इयत्ताो ११ वी विज्ञान शाखेत शिकत असलेली कु. ऋतुजा एडके या विद्यार्थिनीचे वडील हयात नाहीत व आई खाजगी दवाखान्यात काम करून उदरनिर्वाह करते. हि विद्यार्थिनी कुटूंबाच्या आर्थिक परिस्थितीमुळे फीस भरू शकत नसल्यामुळे प्रवेश रद्द करण्यारसाठी महाविद्यालयाच्या कार्यालयात आली होती. याची माहिती मिळताच गरीब व होतकरू विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी नेहमी तत्पर असणारे श्री. मिलींद सोनकांबळे व प्रा. महेशकुमार जाधव यांनी सदरील विद्यार्थिनीस मदत करावी अशी विनंती श्री. सिद्राम चाकोते यांना केली. त्यांनी तात्काळ मदतीसाठी होकार दर्शविला व आज सदरील रक्कमेचा धनादेश महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडे सुपूर्द केला.
राजर्षी शाहू महाविद्यालयाने आरंभापासूनच सामाजिकतेचे भान जपत गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीचा हात दिलेला आहे. अशा विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या वतीनेसुध्दा शिष्यवृत्तीचे वाटप केले जाते. समाजातील दानशूर व्यक्तिनी अशा गरीब व होतकरू विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी पुढे यावे असे आवाहन प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे यांनी केले.