संपादकीय...
विज्ञानवादी दृष्टीकोन असावा
कोरोनाच्या विषवल्लीने सारे जग गांगरुन गेले आहे. भारत तर केवळ आपापले अंथरुण चाचपताना दिसत आहे. कोवीड १९ या विषारी रोगाने सारा भारत पोखरला जातो आहे. भारतीय नागरीकांचे धाडस, संयम जिद्द आणि लॉकडाउनचे पालन या बाबीच कोरोनाला रोखत असून केंद्र व राज्य सरकार हे घाबरु नका, शांत राहा, संचारबंदी-ताळेबंदीचे पालन करा अन्यथा कारवाईला सामोरे या, या संदेशापलीकडेह दुसरे-तिसरे कांही करीत नाही अशीच लोकभावना व्यक्त होताना दिसते आहे.
सामाजीक जाणीवेतून आणि मृत्यूच्या भितीने उपासमारी सहन करुन स्वतःला घरात कोंडवून घेत आहेत. आहे त्या औषधीवर रुग्णाचे यूध्दपातळीवर उपचार वैद्यकीय अधिकारी करीत आहे. जनतेचे सहकार्य आणि सरकारी बळ त्याना धिर देत आहे. केंद्र व राज्य सरकार ज्या पध्दतीने संचार बंदी, लॉकडाउनवर लक्ष केंद्रीत करुन आहे त्या पध्दतीने वैद्यकीय अधिकारी कर्मचार्याना विनाविलंब संशोधीत इंजेक्शन, औषधी उपलब्ध करुन देवून त्याना आधार दिला असता तर आज कोरोना बाधीत मृतांची संख्या नाममात्र राहीली असती यात संदेह नसावा.
कोरोना रोगाने जानेवारीतच भारतात संसर्ग केला पण हाच कोरोना असेल हे निदान लागले नसावे पण तोच संसर्गजन्य कोरोना वायरस आहे हे कळताच वेळीच सावध हेावून सरकारने चाचणी यंत्रणेची व्यवस्था, कृत्रीम श्वसन उपकारणाची निर्मिती, अतिदक्षता कक्षाची निर्मिती औषधी गोळ्याची व्यवस्था केली असती तर आज ही वेळ आली नसती याचे मूळ कारण हे की, केंद्र व राज्य सरकारचे नेतृत्व हे विज्ञानवादी, विज्ञानाधिष्ट कृती-वृत्तीचे नसावे अशी संशयात्मक चर्चा होताना दिसते आहे. ती चर्चा वास्तववादी असावी लोकभावना व्यक्त होताना दिसते आहे. यातच जगातील जनता आणि राज्यकर्त्याची भौतीक, बौध्दीक पातळी किती खोलवरची की वरवरची आहे हे लक्षात येते.
सक्षम अर्थव्यवस्था, प्रशासकीय आरोग्य व्यवस्था, बलाढ्य लोकशाही, हुकूमशाही राज्य व्यवस्था आणि एकाधिकार असलेल्या देशातही कोरोना रोगाने हाहाकार उडविला असला तरी परिणाम मात्र मरण हेच असावे अशा या देशात राज्यकर्ते विज्ञानवादी, तर्कशुध्द डोळस व विश्वासार्ह कार्य करतात तेंव्हा ते अनुकरणीय ठरतात पण लोकशाही ही धर्म निरपेक्षतेचा बूरखा पांघरुन हिंदूत्ववादी, मनुसंस्कृतीचे अंधश्रध्दात्मक तत्वज्ञान देशाच्या माथी मारीत असतील तर यापेक्षा दुसरे कोणते दुर्देव नसावे अशीच चर्चा होताना दिसते आहे.
जनतेने सावध केले म्हणून प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यानी जनता संचारबंदी लागू केली. कोरोना पसरु लागला त्यावेळी परिस्थिती हाता बाहेर जाईल या हेतूने प्रधान मंत्री मोदी यानी लॉकडाउन टाळेबंदी लागू केली. आमजनता काटेकोरपणे नियमाचे पालन करीत असताना जीवणावश्यक वस्तू खरेदीसाठी व्यक्ती बाहेर पडली तर त्यास सुंदरीचा प्रसाद मिळू लागला तरीही जनता आजही भानावर आहे. सामाजीक अंतर ठेवून वावरत आहे. अनेक सर्व सामान्य गोरगरीबाच्या घरी चूली पेटत नाहीत पण मरणाच्या भितीने किंवा माझ्यानंतर माझ्या लेकरांचे काय होईल या भितीपोटी मास्क, सेनीटायझर, साबण, स्वच्छ पाणी अदीची सर्व सोयी नागरीकांच्या घरात आहेत हे सर्व आहे म्हणून कोरोना पळून जाणार नाही त्यासाठी औषधी उपचार हाच एक पर्याय असताना त्याकडे दुर्लक्ष होताना दिसते आहे. ही शासकीय चूक कोण सुधारणार हा प्रश्न सर्वाना भेडसावताना दिसतो आहे हे सत्य कोणी ही नाकारु शकत नाही.
आजघडीला चिन, अमेरिका, जपान, स्पेन, फ्रान्स, इंग्लड, इटली, जर्मनीसह जगभरातील दोनशेपेक्षा अधिक देशात कोरोनाने हाहाकार माजविला आहे. प्रत्येक देशातील सरकार युध्दपातळीवर कोरोनाविरोधी लढाई करीत असले तरी भारत सरकार मात्र घंटानाद करणे, टाळ्या वाजविणे, मेणबत्ती पाजळणे, असे अंधश्रध्दात्मक प्रयोग करीत असल्याने अशाने कोरोनामूक्त भारत कसा काय होईल याकडे भारतीय जनतेसह जगभरातील लोक हास्यास्पद भावनेतून मोदी सरकारची खिल्ली उडविताना दिसतात. त्याचे निराकरण प्रधान मंत्री नरेंद्र मेादी करतील काय अशी लोकभावना व्यक्त होताना दिसते आहे.
कोरोना रोगाच्या विषारी संसर्गाचा नायनाट करण्यासाठी जर्मनी सरकारने या रोगाच्या चाचणी यंत्रणा विकसीत केली. ती औषधोद्योगाच्या सहाय्याने प्रत्येक्षात आपली जलदगतीने निदान करता येईल अशी वैद्यकीय सामुग्री उपलब्ध केली, जनतेसाठी विनाशुल्क सेवा उपलब्ध केली तर डॉक्टर व प्रयोग शाळा तत्रज्ञाच्या हाती ही उपकरणे देवून फिरत्या प्रयोगशाळा, रुग्णालये उभी केली हे विज्ञानवादी दृष्टीकोण जर्मनीने स्विकारला म्हणूनच कोरोना बाधीताची संख्या जास्त असली तरी मृतांची संख्या कमी आहे. म्हणून कोरोना विरोधी लढाईत जर्मनी अमेरिकापेक्षाही सरस ठरली याचे अनुकरण भारत सरकारने करणे गरजेचे वाटते. पण अंधश्रध्दा सोडून विधानवादी दृष्टीकोण स्विकारला पाहिजे यातच कोरोना विरोधी लढाईत यश, अपयश प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांच्या हाती आहे. विजेच्या प्रखर उजेडात कांही होवू शकत नाही मग मेणबत्तीच्या अंधूक प्रकाशात स्वतःचा चेहरा दिसत नाही तर कोरोनामूक्त भारत कसा होईल ही भावना स्वप्नातल्या सौदागराची असू शकते पंतप्रधानाची नव्हे, एवढेच.